मागील महिन्यातील पीएमसी बँकेतील एचडीआयएल घोटाळ्यामुळं सर्वसामान्य लोकांना स्वतःचेच पैसे काढण्यावर लावलेले निर्बंध आणि अशा गुंतवणूकदारांचे बँकेकडं असलेल्या कोट्यवधी रुपयांचं काय होणार अथवा काय झालं हा प्रश्न अनुत्तरीत असताना अनेकांच्या जिव्हाळ्याची व पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचा खास विश्वास संपादन केलेल्या सहकारी बँकेस रिझर्व्ह बँकेनं लावलेल्या कोटी रुपयांच्या पेनॉल्टीमुळं पुन्हा सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकविला. यावर सध्या तरी बँकेच्या सीईओनी सारवासारव केली असली तरी प्रत्येक खातेदाराच्या व खासकरून बँकेतील गुंतवणूकदाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकल्यावाचून राहणार नाही. अनेक गुंतवणूकदारांचा आत्तापर्यंत हा भ्रम होता की सर्वांत सुरक्षित गुंतवणूक म्हणजे बँकेतील एफडी ! परंतु, बँकेच्या मुदत ठेवीस देखील केवळ १ लाखाचंच विमा कवच असतं हे आतापर्यंत सर्वानाच कळून चुकलंय. १९९३ मध्ये सुधारणा केल्या गेलेल्या या नियमात खरं तर आता पुन्हा योग्य सुधारणा करण्याची गरज आहे. कारण १९९३ साली एसबीआय सारख्या सरकारी मुदत ठेवीमध्ये गुंतवलेले १ लाख पुनर्गुंतवीत गेल्यास त्याची आज २६ वर्षांनंतर किंमत ही कमीत कमी १२ लाख रुपये झालीय. मग आता त्यावरील सुरक्षा विमा १ लाख असल्यास काय उपयोग ?
बुद्धीवादी गुंतवणूकदार मागील कांही वर्षांत मुदतठेवी ऐवजी डेट म्युच्युअल फंडाकडं वळलेला होता परंतु मागील वर्षातील आयएल अँड एफएस व डीएचएफएल मधील समस्यांमुळं अनेकांना मॅच्युरिटीला देखील परतावे मिळालेले नाहीत.
तिसरा सुरक्षित मार्ग म्हणजे, सोन्यामधील गुंतवणूक. परंतु ही गुंतवणूक देखील सुरक्षित आहे का ? सोन्याचा दर हा देखील वर-खाली होतच असतो व तो दर देखील जागतिक घडामोडींवर अवलंबून असतो, म्हणजे जोखीम ही आहेच. त्यातून अशी केलेली गुंतवणूक केलेलं सोनं सांभाळायचं म्हणजे देखील जोखीम, त्यातच मागील आठवड्याच्या शेवटी, मोदी सरकार बेहिशेबी सोन्याबाबत 'माफी' योजना आणण्याच्या विचारात आहे अशी वावडी उठल्यावर ह्या प्रकारात गुंतवणूक केलेले व करू इच्छिणारे देखील यापासून दूर राहणं पसंद करतील. ही व्यथा आहे सर्वांत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या गुंतवणूक पर्यायांची. तर मग प्रश्न असा पडतो की सर्वांत सुरक्षित गुंतवणूक कोणती ? नुसतं बँक खात्यात पैसे ठेवणं ? परंतु इथं देखील जोखीम (पीएमसी बँकेमुळं ऐन दिवाळीत लोकांचं दिवाळं काढलं). गुंतवणूक म्हटलं की जोखीम ही आलीच. आता सर्वसाधारण गुंतवणूकदारांच्या मनात खरा प्रश्न उद्भवलाय की पैसे ठेवायचे कुठं ? गुंतवणूक करायची कुठं ? कारण जोखीम तर सर्वत्रच दिसत आहे. तर माझ्या मते, सर्वांत सुरक्षित गुंतवणूक अशी संज्ञाच गुंतवणूक शास्त्रात नाही. तर मग गुंतवणुकीच्या प्रत्येक पर्यायात कमी अधिक जोखीम असेल तर योग्य प्रकारे जोखीम जोखून पैसे गुंतवण्यास काय हरकत आहे ? हिम्मत-ए-मर्दा तोह मदद-ए-खुदा..
माझं अगदी प्रामाणिक मत आहे की तुमच्या पुढील एक वर्षाच्या गरजा भागतील एवढी रक्कम नेहमी हाताशी ठेवा, ती कधीच जोखीम असलेल्या पर्यायात गुंतवू नका. जी रक्कम पुढील दोन-तीन वर्षानंतर लागणार आहे ती तुलनेनं कमी जोखीम असलेल्या पर्यायात गुंतवा व सर्वांत जास्त जोखीम म्हटल्या जाणाऱ्या प्रकारात म्हणजे शेअरबाजारात गुंतवणूक करताना कमीतकमी पुढील ५ ते १० वर्षांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊनच गुंतवणूक करा व वेळोवेळी हाव न करता त्यातून आपला परतावा तपासून हाव न धरता नफा वसूली करत रहा आणि वेळ आल्यास, धोका जाणवल्यास मुद्दल काढून घ्यावयास देखील मागं-पुढं पाहू नका. सध्याचा शेअरबाराचं (सेन्सेक्स) मूल्य हे त्याच्या पुस्तकी मूल्याच्या २.९४ पट आहे, जे २०१८ साली ३.३५ पट होतं, तर २००८ सालच्या तेजीमध्ये ते ५.४७ पट होतं. आता, भारतीय बाजाराचं मार्केट कॅपिटलायझेशनचं भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाशी (जीडीपी) गुणोत्तर प्रमाण हे ७८.५ % आहे जे २००७ सालच्या तेजीत १४६ % होतं. तर सध्या निफ्टीचा पीई रेश्यो हा २७.४७ असून २९.९० ह्या त्याच्या ३ जूनच्या उच्चांकापेक्षा कमीच आहे तर हाच २००८ मधील उच्चांक होता २८.२९.
अशा परिस्थितीत चांगल्या व्यवसायात गुंतवणूक करा. जो व्यवसाय आपणांस समजतो त्यातच गुंतवणूक करा. उत्तम व्यवसायिक मूल्य असलेल्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक करा. अशा कंपन्यांकडं लक्ष ठेवा, की त्या कंपनीच्या प्रमुख उत्पादनास तोडीसतोड कोणतंच उत्पादन नसेल व जे उत्पादन पुढील १०-१५ वर्षं तग धरून राहील (उदा. नेसकॅफे, मॅगी, फेविकॉल, खास पेटंट असलेली औषधं, इ.) ढोबळमानानं भारतीय कंपन्यांची मागील ७-८ वर्षातील उत्पन्नात नरमाईच होती आणि पुढील काही वर्षांत जरी उत्पन्नाची भरपाई जोरकस नसली तरीही आपण ठीकठाक उत्पन्नाच्या चक्राची अपेक्षा ठेऊ शकतो. ज्यांत प्रामुख्यानं मोठा वाटा हा सरकारी व खाजगी मोठ्या बँकांचा असून, सिमेंट कंपन्या, हॉस्पिटल्स-हॉटेल्स, इन्शुरन्स कंपन्या, स्टील आदी क्षेत्रांना पुढील वर्षांत सुवर्ण दिवस येतील असं वाटतंय. त्याजबरोबरीनं पीएसयू कंपन्यांना देखील विसरून चालणार नाही. आता, कमी व्याजदर असतानाच योग्य पुरवठा साखळी व नवनवीन नोकऱ्या निर्माण करून मागणी बाजारात नवचैतन्य साधणं ही आज काळाची गरज ठरतीय.. पाहू काय होतंय ते..
तेजीवाल्यांना नव्या पातळयांची साद
मागील सोमवारच्या सुटीनंतर बाजारात तेजी दिसून आली. १८ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताची परकीय चलन थैली १.४ अब्ज डॉलर्सनं वाढून आजपर्यंतच्या सर्वोच्च म्हणजे ४४०.७५ बिलियन अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे या वृत्तामुळं बाजारावरील तेजीची पकड कायम राहिली. पुढच्याच दिवशी परकीय थेट गुंतवणुकीबाबतची धोरणं शिथिल करण्याबद्दलचं सूतोवाच आणि लाभांशावरील कर मागं घेण्याबाबत व दीर्घमुदत भांडवली नफ्यावरील करासंबंधी अर्थमंत्र्यांनी दाखवलेला सकारात्मक पवित्रा बाजार वरती राहण्यास कारणीभूत ठरला. जरी शेवटच्या दोन दिवसांत नफेखोरीस प्राधान्य दिसून आलं तरी, गेल्या आठवड्यात निफ्टीनं सव्वादोन टक्क्यांची तर सेन्सेक्सनं सुमारे १००० अंशांची तेजी अनुभवली. ११७०० ही प्रतिकार पातळी ओलांडल्यावर लागलीच निफ्टीनं वरील बाजूस झेप मारलेली आढळून आली. आता ११७०० व ११५५० हे निफ्टीचे पुढील वाटचालीसाठी नजीकचे आधार संभवतात तर १२००० व १२२०० ह्या पातळ्या, समोरील आव्हानं. लांबचाच विचार केला तर १२७०० व १३३०० ह्या पातळ्या तेजीवाल्यांना साद घालत नसतील तरच नवल.
सुपरशेअर – येस बँक
सहा महिन्यांपूर्वी अडीचशेच्या घरात व्यवहार करणारी व वर्षभरापूर्वी अनेकांच्या गळ्यातील ताईत असलेली व नंतर बत्तीस रुपयांवर भाव आल्यावर सर्वांनी नो म्हटलेली बँक म्हणजे येसबँक. मागील गुरुवारी एकाच सत्रात या शेअरचा भाव तब्बल ३९ टक्क्यांनी वधारला होता. बँकेनं शेअरबाजारास कळवलेल्या वृत्तानुसार बँकेस १२० कोटी अमेरिकन डॉलर्स म्हणजे ८४.८४ अब्ज रुपयांचा खरेदीचा प्रस्ताव आलेला आहे. प्रवर्तकांनी बँकेतील हिस्सा कमी केल्यानंतरच्या कटू आठवणी पुसण्यास अशा गोष्टींची नक्कीच मदत होणार असल्यानं या बँकेच्या शेअर्सनी उसळी मारली. परंतु दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालात ७०९ कोटी रुपयांची करतरतूद केल्यामुळं ६०० कोटी रुपयांचा तोटा जाहीर करावा लागलाय. त्याचप्रमाणं अनुत्पादीत कर्जाचं जून तिमाहीतील प्रमाण ५ टक्क्यांवरून वाढून ७.३९ टक्क्यांवर गेलंय. अशा बँकेचा शेअर सर्वात जास्त व्यवहार झालेला शेअर ठरला आहे. एकूणच, कंपनीच्या दाव्यानुसार एकूण समोर असलेल्या ३०० कोटी अमेरिकन डॉलर्सचे प्रस्ताव आणि बँकेची सध्याची परिस्थिती पाहता थोड्या पडझडीत योग्य भावात खरेदी केल्यास थोडक्या कालावधीत चांगला परतावा देणारी बँक म्हणून पाहता येऊ शकतं.